
मराठवाडा मुक्तिसंग्रामात हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अमूल्य- पालकमंत्री नरहरी झिरवाळ
महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा शासनाचा प्रयत्न
हिंगोली दि.17 : मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी अनेक हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे योगदान अमूल्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील अण्णासाहेब टाकळगव्हाणकर बाल उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभप्रसंगी श्री. झिरवाळ बोलत होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय श्रीमती मालतीबाई पैठणकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार सर्वश्री. गजानन घुगे, रामराव वडकुते, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, राज्य राखीव पोलीस दलाच्या महानिदेशक पौर्णिमा गायकवाड,अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही देशातील काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद ही संस्थाने विलीन झाली नव्हती. हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून हा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा हा लढा होता. सतत १३ महिन्यांच्या आंदोलनात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली. त्यातून आजचा हा दिवस 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाल्याने पाहता आला असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा 77 वा वर्धापन दिन आज मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिल्याचे सांगून ते म्हणाले की, मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी येथील जनतेचा त्याग सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. राज्य शासन स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि जनतेच्या याच त्यागाबद्दल कृतज्ञ राहून कार्य करीत असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 म्हणजेच मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राज्यभरात “सेवा पंधरवाडा” तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गावांमधील पाणंद व शिवरस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, तसेच संमतीपत्रे घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वासाठी घरे’ उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय जमिनींचे पट्टे वाटप, अनधिकृत बांधकामांचे नियमन आणि निवासी जमीन उपलब्ध करून देण्याचे काम होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून, जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करणे, तालुक्यातील गायरान जमिनीच्या केएमल फाईल तयार करणे इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले.
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ जिल्ह्यात आज दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व महिलांचे मधुमेह, रक्ताक्षय, उच्च रक्तदाब, क्षयरोग, कर्करोग इत्यादी आजारांची तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाने “सेवादूत हिंगोली” ही वेब प्रणाली तसेच व्हाटस् अप चाटबोट (9403 55 9494) ही प्रणाली, ईक्यूजे कोर्ट लाईव्हबोर्ड सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशन, व्हॉटस्अप (8545 08 8545) बेस तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. ही सेवा नागरिकांच्या समस्या जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने सोडविण्यात उपयोगात येणार आहेत, असे पालकमंत्री श्री. झिरवाळ म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत हळदीच्या आधुनिक वाणाचे संशोधन व विस्ताराचे कार्य चालू असून, येथील हळदीला भौगोलिक मानांकनही मिळाल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले. शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपयांपर्यंत वाढीला शासनाने मान्यता दिली आहे. याचा जिल्ह्यातील 6 हजार 196 लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या 22 जणांच्या वारसांसाठी 2 कोटी 20 लाख रुपयाचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून लवकरच त्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे 339 कोटी 97 लक्ष 64 हजार रुपयाचा निधी वितरीत केला असून चालू वर्षी जवळपास 4 कोटी निधी वितरणाची कार्यवाही सुरु आहे. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु असून लवकरच त्यांना मदत मिळवून देण्याची कार्यवाही सुरू करणार असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी म्हणाले.
प्रारंभी राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली.
यावेळी श्री. झिरवाळ यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय मालतीबाई पैठणकर यांच्यासह सर्वांचे शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच श्री. झिरवाळ यांनी लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार यांची भेट घेत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यस्तरीय श्रेया आयएएस शासनमान्य स्पर्धा परीक्षेत प्रथम आल्याबद्दल कु. श्रीकांत कंधारे यांचा व मॅथेमॅटिक्स हा इलीट बुक ऑफ रेकॉर्ड-2025 मध्ये अबॅकस गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले समग्र वाङमयाचे विमोचन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री.झिरवाळ यांच्या हस्ते कुणबी मराठा जात प्रमाणपत्राचेही वितरण करण्यात आले.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा अभियाना’चा जिल्ह्यात प्रारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा 2025 मोहीम दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याचा जिल्हास्तरीय प्रारंभ आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. यावेळी पत्रकार, नागरिक,विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.