नागपूर विभागात सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम प्रभावीपणे राबवा


विभागीय आयुक्त व सेवा हक्क आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

नागपूर, दि 17 : विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रामीण व जिल्हास्तरावर येत्या 28 एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती व पहिला ‘सेवा हक्क दिन’ साजरा करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि राज्य लोकसेवा हक्क आयोग नागपूर विभागाचे आयुक्त अभय यावलकर यांनी आज संबंधित जिल्हा प्रशासनाला दिल्या.

श्रीमती बिदरी आणि श्री. यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ साजरा करण्यासंदर्भातील पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी  जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंह पवार, विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांच्यासह दूरदृष्य प्रणालीद्वारे वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि व्यक्तींना पात्र लोकसेवा देणाऱ्या शासकीय विभागांमध्ये पादर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी राज्यात 28 एप्रिल 2025 पासून लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य शासनाने या वर्षीपासूनच 28 एप्रिल हा ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या कायद्याची दशकपूर्तीही होत आहे. या निमित्ताने नागपूर विभागातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, नगर परिषदा व नगर पंचायतांच्या कार्यक्षेत्रांमध्ये राबवायच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. अनुषंगिक मार्गदर्शन व सूचनाही करण्यात आल्या.

सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर आदर्श आपले सरकार केंद्राचे उद्घाटन करणे, विशेष ग्रामसभेचे आयोजन करून लोकसेवा हक्क कायद्याच्या ठळक तरतूदींचे वाचन करून ग्रामपंचायत सदस्यांना कायद्याच्या प्रती वितरीत करणे, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या कायद्याची माहिती देणारे सूचना फलक लावणे, अधिसूचित सेवांची व शुल्काची माहिती देणारे क्यू आर कोड लावणे आदी उपक्रम राबविण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हास्तरावर सेवा हक्क दिननिमित्ताने पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, नागरिक यांच्या उपस्थित समारंभाचे आयोजन करून लोकसेवा हक्क कायद्याचे वैशिष्ट्ये विषद करणे आणि विविध विभागांकडून देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेवून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, जिल्ह्यात सेवा दूत योजना सुरू करणे, नागरिकांना एसएमएसद्वारे या कायद्याबाबत व आपले सरकार पोर्टलची माहिती देणे, शाळा व महाविद्यालयांमध्ये या कायद्याच्या जागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे, लोककलांद्वारे या कायद्याचा प्रचार-प्रसार करण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या.

महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रांमध्ये सेवा हक्क दिनानिमित्ताने विशेष सभेचे आयोजन करून या कायद्यात अंतर्भूत सेवा देण्याच्या कामगिरीचा अहवाल सादर करणे, नागरिकांना घरपोच सेवा देण्यासाठी ‘सेवादूत’ योजना सुरू करणे, नागरी सुविधा केंद्रांद्वारे सेवा हक्क कायदा व आपले सरकार पोर्टलबाबत माहिती देणे, प्रभाग कार्यालय, पर्यटन व तिर्थस्थळे, महाविद्यालय परिसर आदी ठिकाणी लोक सेवा हक्क कायद्याबाबत माहिती फलक लावण्याबाबत यावेळी श्रीमती बिदरी आणि श्री यावलकर यांनी उचित मार्गदर्शन करून सूचना दिल्या.

 


error: Content is protected !!
नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 8888301363 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें