मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा आणि विविध पुरस्कारांचे वितरण
नागपूर, दि. 8 : ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजनेतून अनेक बदल सुरू आहेत. स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज तयार होत आहेत. आपल्या जिल्ह्यात सातनवरी हे पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून नावारुपास आले आहे. या धर्तीवर सर्वच गावांनी बदलासाठी सिद्ध झाले पाहिजे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील किमान 50 ग्रामपंचायती सातनवरी सारख्या व्हायला पाहिजेत. यासाठी विविध योजना, जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासोबतच अंगणवाड्या अधिक दर्जेदार झाल्या पाहिजे. वडधामना येथील अंगणवाडी आदर्शवत आहे. किमान शंभर अंगणवाड्या वडधामनासारख्या करण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात जिल्हा परिषदेमार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि आदर्श ग्रामपंचायत अधिकारी व आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पूरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पावनगाव आणि खुर्सापार या ग्रामपंचायतींचा गौरव यावेळी करण्यात आला.
वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. आशिष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी आमदार टेकचंद सावरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत) कपिलनाथ कलोडे यांच्यासह ग्रामसेवक, सरपंच, बचत गट प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.
पुढील पाच वर्षांत अधिकाधिक खर्च हा शिक्षणावर खर्च होईल. जलजीवन सहित इतर पाणीपुरवठा योजना सुरळीत करायच्या आहे. प्रत्येकाला व प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. जिल्ह्यात अनेक कोल्हापुरी बंधारे नादुरुस्त असून जलसंधारण वर करण्याची गरज आहे. नवीन बंधारे निर्मितीचा प्रस्ताव न पाठविता जुने बंधारे दुरुस्त करण्यात यावेत. पुढचा पंधरा वर्षाचा जल पुर्नभरणाचा विचार होण्याची गरज असल्याचे श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.
प्रत्येक गावाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी जास्तीत जास्त निधी आरोग्यासाठी देऊ. आरोग्य केंद्र, उपकेंद्र, औषधी साठी निधी देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यावरील विश्वास पुन्हा मिळवू, असा विश्वास पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले की, ग्राम स्तरावरील ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. आता गावच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे. जिल्ह्याला आता उत्पादक करायचे असून गावातले बचत गट उत्पादक झाले पाहिजे. गाव जेवढा उत्पादक होईल तेवढी अर्थव्यवस्था सुधारेल. ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्राहक न होता उत्पादक होण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन वित्त राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी यावेळी केले.
आमदार आशिष देशमुख यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी केले. आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे यांनी मानले.