मधुकर अण्णा झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन


नाशिकचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड

नाशिक, दि २६ एप्रिल २०२५ -मधुकरअण्णा झेंडे यांचे आज दुःखद निधन झाले.गुण गाईन आवडी हे मधुकर (अण्णा )झेंडे लिखित पुस्तक मागील दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते. हे पुस्तक म्हणजे मधुकर अण्णा झेंडे यांच्या ७५ वर्ष कार्याचा आढावा असले तरी तो नाशिकचा सांस्कृतिक इतिहास आहे.
मधुकर झेंडे यांना बालपणापासूनच सार्वजनिक कामात सक्रिय झाले आणि तेवढी सक्रियता त्यांनी वयाच्या ८८ वर्ष पूर्ण होतानाही जपली होती.मधुकर अण्णा झेंड्यांचे वडील फळांचे व्यापारी होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले व विसाव्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यामुळे लवकरच त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी पडली. शालेय शिक्षणाच्या काळातच त्यांना तालमीची आवड निर्माण झाली. अनेक कुस्त्या त्यांनी जिंकल्या.
त्यांचा नगरपालिकेतला प्रवास मुकादम म्हणून झाला. परंतु सतत कार्यशील असलेल्या अण्णांनी आपल्या कर्तबदारीवर नाशिक नगरपालिकेचे स्वागत अधिकारी हे पद मिळवले. त्या पदाला योग्य न्याय दिला. महानगरपालिकेच्या सर्व कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचतील, कार्यक्रमातून महानगरपालिकेचे काम लोकांपर्यंत पोहोचेल तसेच भारतभरातील सर्व क्षेत्रातील कलाकार साहित्यिक यांना नाशिक शहर आपलेसे वाटेल तसेच त्यांच्या कार्यक्रमांमुळे नाशिकचा सांस्कृतिक इतिहासात भर पडेल याकरिता त्यांनी सात दशकाहून अधिक काळ मेहनत घेतली.
अतिशय गुणग्राहक असलेल्या औरंगाबादकरांमुळे त्यांचा प्रवेश सार्वजनिक वाचनालयात झाला. त्यांना कार्यवाह केले. त्यानंतर आपल्या कार्यामुळे ते सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष झाले. आपल्या उमेदीच्या काळात जवळजवळ प्रत्येक दिवस त्यांनी सार्वजनिक वाचनालयाला भेट देऊन वाचनालयाचे काम वेगाने पुढे जाईल याकरता काम केले.
महानगरपालिकेच्या आपल्या पन्नास वर्षापेक्षा जास्तीच्या कार्यकाळात त्यांनी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले व जनसंपर्क अधिकारी कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण तयार केले. त्यांच्याच काळात दीनानाथ मंगेशकर यांचा पुतळा उभा राहिला. नाशिक महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे ते पहिले व्यवस्थापक होते. कवी कुसुमाग्रजांचा आशीर्वाद त्यांना लाभला.नाटककार वसंतराव कानेटकर यांचा सहवास लाभला. नाट्यकर्मी जवळच असल्यामुळे नाट्य चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. महाराष्ट्रातील सर्वच नाट्य चळवळीतल्या लोकांना नाशिक आपले दुसरे घरच वाटेल याकरता त्यांनी काम केले. नाशिक महानगरपालिकेतर्फे उभे राहिलेल्या कालिदास कलामंदिर, दादासाहेब फाळके स्मारक या सारख्या कितीतरी नाशिक साठी गौरव ठरलेल्या वास्तूंच्या उभारणीसाठी त्यांनी प्रयत्न केले.
मधुकर अण्णा झेंडे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सत्तरपेक्षा जास्त वर्ष वेगवेगळ्या सार्वजनिक संस्थांमध्ये काम केले. आपल्या विनम्र व कार्यशील स्वभावाचा व जनसंपर्काचा उपयोग या संस्थांच्या उभारणीसाठी त्यांनी केला.
मधुकर अण्णा झेंडे यांच्या कुटुंबाची साथ त्यांना जीवनभर लाभली. त्यांची मुले, नातवंडे आपल्या आयुष्यात उत्तमरित्या स्थिर आहेत. त्यांच्या बोलण्यातून त्यांचे कुटुंबीय त्यांची किती काळजी घेते याविषयी माहिती मिळत होती. अण्णांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला तसेच परदेशी भ्रमणही केले. अतिशय परिपूर्ण आयुष्य अण्णा जगले.
गुण गाई आवडी हे अण्णांचे तिसरे पुस्तक आहे. दीपस्तंभ, नाशिकच्या चौकांचा इतिहास ही नाशिककरांना भावलेली अण्णांची पुस्तके आहेत. खरे म्हणजे ही दोन्ही पुस्तके वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह आहे. त्यातील नाशिकचे चौक या नावाने लेख सकाळ वर्तमानपत्रात दर आठवड्याला एक असे शंभर पेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झाले. चौकांचा इतिहास ही नुसती चौकांविषयी माहिती नाही तर त्या चौकांचा सार्वजनिक इतिहास आहे. त्या चौकात वावरलेल्या कर्तबगार लोकांची माहिती आहे. वेगवेगळ्या सांस्कृतिक , ऐतिहासिक घटना त्या त्या चौकात घडल्या त्याचा इतिहास आहे. येणारे अनेक वर्ष नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासावर लिहिणाऱ्यांना तो एक अतिशय अजरामर ठेवा मधुकर अण्णा झेंडे यांच्यामुळे मिळाला आहे.
मधुकर अण्णा झेंडे यांचा मंगेशकर कुटुंबाशी गेली पन्नास पेक्षा जास्त वर्ष स्नेहबंध आहे. या पुस्तकात त्याही विषयी बरीच माहिती मिळते.
मधुकर अण्णा झेंडे नाटक, सिनेमा या चळवळीशी नेहमीच निगडित राहिले. त्यांनी नाटकात तसेच अनेक चित्रपटात लहान मोठ्या भूमिका केल्या. नाट्यक्षेत्रातील, चित्रपट क्षेत्रातील लोकांशी स्नेहबंध जोडला.
गुण गाईन आवडी या अण्णांच्या आयुष्यावरील पुस्तकात अण्णांच्या स्नेहीनी गेल्या ४०-५० वर्षात अण्णांवर लिहिलेले लेख आहेत. अण्णांनी वेगवेगळ्या संस्थांमध्ये केलेल्यांचा कार्य वृत्तांत आहे. अण्णांनी विविध क्षेत्रात काम केलेल्या लोकांचे लेख आहेत. नाशिकमध्ये गेल्या ७५ वर्षातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे दुर्मिळ फोटोग्राफ आहेत. अतिशय वाचनीय असे हे पुस्तक आहे.
नाशिक शहरातील व्यक्तिगत आयुष्यात, सार्वजनिक आयुष्यात कर्तबदारी कमवणाऱ्या सर्वच व्यक्तींचे काम अण्णांनी लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांचा कार्याचा गौरव केला. त्यांचे स्मरण समाजाला राहील यासाठी काम केले. त्यांनी केलेल्या कामाची दखल देखील समाज घेत होता.दरवर्षी अण्णांचा वाढदिवस त्यांच्या संपर्कातील सर्वच व्यक्ती अतिशय आनंदाने साजरा करत होते. अण्णांचा सर्व क्षेत्रातील वावर होता ,नाशिकचा चालता बोलता इतिहास मधुकर (अण्णा) झेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !


error: Content is protected !!
नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 8888301363 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें