विद्यार्थ्यांमध्ये रुजावा वैज्ञानिक दृष्टिकोन – ॲड. नितीन ठाकरे
‘तारांगण : अंतराळाची सफर’ उपक्रमाची मविप्र होरायझन अकॅडमी मध्ये सुरुवात

नाशिक– विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि त्यांना विश्वाच्या अद्भुततेची ओळख करून देण्यासाठी मविप्र माजी विद्यार्थी संघटनेने पोलाद स्टीलच्या मोबाईल प्लॅनेटेरियमच्या सहकार्याने ”तारांगण : अंतराळाची सफर’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन नाशिकमधील गंगापूर रोडवरील मविप्रच्या होरायझन ॲकॅडमी सीबीएसई येथे उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते. या उपक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी बोलताना ॲड. नितीन ठाकरे यांनी आजच्या वेगवान जगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याच्या महत्त्वावर जोर दिला. त्यांनी मविप्र माजी विद्यार्थी संघटना आणि पोलाद स्टील यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली, ज्यांनी मविप्रच्या विद्यार्थ्यांना ही अनोखी शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिली. इतर मान्यवरांनीही या’ कार्यक्रमाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आणि हा उपक्रम भावी पिढीतील शास्त्रज्ञ आणि संशोधक घडवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे मत व्यक्त केले. मविप्र माजी विद्यार्थी संघटनेचा हा उपक्रम मविप्रच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अंतराळाबद्दल माहिती आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा एक प्रयत्न आहे. या अनोख्या आणि संवादपूर्ण अनुभवातून विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान आणि खगोलशास्त्र विषयी आवड निर्माण होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
हा उपक्रम विद्यार्थ्यांना एक आकर्षक आणि प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे फिरते तारांगण (इनफ्लॅटेबल डोम प्लॅनेटेरियम). एका सत्रात सुमारे ३० विद्यार्थी या तारांगणात विश्वाचा अनुभव घेऊ शकतील. प्रत्येकी ३० मिनिटांच्या सत्रात विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, सौरमंडल आणि विशाल विश्वाची माहिती मनोरंजक पद्धतीने दिली जाईल. या उपक्रमामध्ये इस्रोच्या चांद्रयान मोहिमेसारख्या आधुनिक विषयांचाही समावेश असेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान आणि संबंधित क्षेत्रांबद्दल अधिक माहिती मिळेल आणि प्रेरणा मिळेल.
याप्रसंगी इगतपुरी तालुका संचालक ॲड. संदीप गुळवे, नाशिक शहर संचालक ॲड. लक्ष्मण फकिरा लांडगे , शिक्षणाधिकारी डॉ. कैलास शिंदे, होरायझन ॲकॅडमी सीबीएसईच्या प्राचार्या ज्योती सामंता आदी उपस्थित होते.