मराठा हायस्कूलमध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विविध उपक्रम व विद्यार्थी जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात आले. याद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश देयात आला. याप्रसंगी व्यासपीठावर उपक्रमशील मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, उपमुख्याध्यापक तथा मविप्र सेवक संचालक चंद्रजीत शिंदे, पर्यवेक्षक रामनाथ गडाख, देविदास भारती, नंदा जाधव व ज्येष्ठ लिपिक नानासाहेब गवारे उपस्थित होते.
याप्रसंगी किरण शिंदे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच व्यसनमुक्त व बलशाली भारत घडविण्यासाठी भावी तरुण पिढीने आज एक चांगला संकल्प करून व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.जेणेकरून एक सुंदर सुदृढ व निरोगी पिढी निर्माण होईल आणि भारताला उज्वल भविष्याकडे घेऊन जाईल असा आशावाद आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
युनायटेड नेशन असेंब्लीने 7 डिसेंबर 1987 रोजी एक ठराव संमत करून अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामाणबाबत लोकांमध्ये प्रतिबंध आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आजकाल तरुण पिढी फार लवकर अंमली पदार्थांकडे आकर्षित होत आहे त्यामुळे कमी वयातच अनेक तरुणांना कर्करोग,मेंदू विकार, यकृताचे विकार यांनी ग्रासलेले आहे. काही काळासाठी आनंद देणारे हे अंमली पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक थोरात म्हणाले “जीवन खूप सुंदर आहे, नशेच्या आहारी जाऊन त्याचा विनाश करू नका व्यायाम आणि खेळ तसेच योगा,प्राणायाम सारख्या चांगल्या आरोग्य सवयींनी आपले शरीर स्वस्थ व सुदृढ बनवा.विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयी अंगीकारा आणि उज्वल भारताचे सुदृढ नागरिक बना.” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
पर्यवेक्षक रामनाथ गडाख यांनी आभार मानले. जनजागृतीपर कार्यक्रमानिमित्ताने विद्यालयात निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.