पहिल्याच स्पर्धेत ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग
नाशिक : बीके एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी यांच्या वतीने आयोजित पहिली राज्यस्तरीय ‘ बीके मॅरेथॉन 2026 रविवारी (२२) आज पहाटे नाशिकच्या मविप्र मॅरेथॉन चौकात मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडली. अगदी ९ वर्षांच्या मुलांपासून ७० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत आणि महिलांच्या मोठ्या सहभागामुळे या स्पर्धेला विशेष झळाळी प्राप्त झाली.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ॲड. नितीन ठाकरे, आंतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमके, रविना गायकवाड, डॉ. वासंती कोरडे, बाल कल्याण समिती अध्यक्ष अॅड. मिलिंद बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि खजिनदार संतोष भडांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.
पहाटेच्या गुलाबी थंडीत धावपटूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धेपूर्वी धावपटूंसाठी खास झुंबा डान्स सत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे वातावरणात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली.
नाशिक जिल्ह्यातील ५०० हून अधिक धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये धावून फिटनेसचा संदेश दिला. प्रत्येक स्पर्धकाला ‘बिब नंबर’ देण्यात आला होता. धावपटूंसाठी नाश्त्याची उत्तम सोय करण्यात आली होती. सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या भव्य उपक्रमाचे आयोजन बीके एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीचे सचिव डॉ. ॲड. भगवान निवृत्ती येलमामे आणि अध्यक्ष किशोर निवृत्ती येलमामे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन आहेर यांनी केले.
“आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश घराघरात पोहोचावा, या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. नाशिककरांनी दिलेला प्रतिसाद थक्क करणारा आहे,” असे मत आयोजकांनी यावेळी व्यक्त केले.
सदर स्पर्धेमध्ये एकूण दोन लाखापर्यंतचे रोख बक्षिसे ठेवण्यात आली होती. रोख बक्षिसे वितरणासाठी वेगवेगळे वयोगट ठेवण्यात आले होते. विविध वयोगटांतील स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिके पटकावली पारितोषिक वितरणाचा तपशील पुढील प्रमाणे _10 किमी (वयोगट 18 ते 30 वर्षे) पुरुष गटात गोविंदा पाडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत ₹10,000 चे पारितोषिक मिळविले, तर महिला गटात रवीना गायकवाड यांनी प्रथम क्रमांकासह ₹10,000 मिळविले. पुरुष गटात मुकेश राजपूत (₹7,000) यांनी दुसरा व सौरभ भुके (₹5,000) यांनी तिसरा क्रमांक मिळविला. महिला गटात रीमा श्रीवास्तव (₹7,000) यांनी दुसरा क्रमांक मिळविला.5 किमी (वयोगट 18 ते 30 वर्षे) गटात अतुल बर्डे व विशाखा शिंदे यांनी प्रत्येकी प्रथम क्रमांक पटकावत ₹5,000 पारितोषिक मिळविले. जॉन व शुभांगी गायकर यांनी दुसरा क्रमांक (₹3,000) तर कार्तिक करीहरहल व रविना चौधरी यांनी तिसरा क्रमांक (₹2,000) मिळविला. 3 किमी (वयोगट 8 ते 17 वर्षे) गटात तेजस सपकळे व ईश्वरी पवार यांनी प्रथम क्रमांक (₹3,000) मिळविला. प्रतीक लहारे व दिया जाधव यांनी दुसरा क्रमांक (₹2,000) तर जयेश तुंगार व ज्ञानेश्वरी लंगुटे यांनी तिसरा क्रमांक (₹1,000) पटकाविला.10 किमी (वयोगट 31 ते 45 वर्षे) पुरुष गटात चिंतामण गायकवाड व महिला गटात ज्योती नागरे यांनी प्रथम क्रमांक (₹7,000) मिळविला. कांतिलाल कुंभार व पूजा शिंदे यांनी दुसरा क्रमांक (₹5,000) तर दमन्या राऊत व प्राजक्ता काटकर यांनी तिसरा क्रमांक (₹3,000) मिळविला.5 किमी (वयोगट 31 ते 45 वर्षे) गटात राज शेख व सोनाली महाजन यांनी प्रथम क्रमांक (₹4,000) मिळविला. देविदास सानप व गीतांजली पवार यांनी दुसरा क्रमांक (₹2,500) तर मनोहर राठड व नीलिमा ढोले यांनी तिसरा क्रमांक (₹1,500) पटकाविला.10 किमी (वयोगट 45 वर्षांवरील) गटात अशोक पवार व शीतल सांचवी यांनी प्रथम क्रमांक (₹4,000) मिळविला. माणिक निकम व डॉ. मनिषा रौंधळ यांनी दुसरा क्रमांक (₹3,000) तर नंदू उगले व रेखा पवार यांनी तिसरा क्रमांक (₹2,000) मिळविला.5 किमी (वयोगट 46 वर्षांवरील) गटात रविंद्र आहेर व संगीता भोज यांनी प्रथम क्रमांक (₹2,000) मिळविला. नितीन रौंधळ व लता शिवाडे यांनी दुसरा क्रमांक (₹1,500) तर परेश शाह व आशा परदेशी यांनी तिसरा क्रमांक (₹1,000) मिळविला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व विजेत्यांचे व आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

